
पश्चिम रेल्वेवर सोमवारपासून वातानुकूलित लोकल फेऱ्यांच्या संख्येत आठने वाढ होऊन दररोज 12 ऐवजी 20 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे वेळापत्रकातील 6 फेऱ्या अतिरिक्त असून 2 फेऱ्या साध्या लोकलच्या बदल्यात चालविण्यात येतील. त्यामुळे रोजच्या एकूण लोकल फेऱ्यांची संख्या
आता 1367 वरून 1373 इतकी होणार आहे.
भविष्यात उपनगरीय लोकलच्या सर्वच्या सर्व फेऱ्या वातानुकूलित करण्याची रेल्वे बोर्डाची योजना आहे. मुंबई उपनगरीय प्रवाशांच्या सोयीसाठी येत्या चार वर्षांत मुंबईत 210 एसी लोकल येणार आहेत. सध्या एसी लोकलचे भाडे फर्स्ट क्लासच्या 1.3 पट असल्याने या लोकलमध्ये बसण्यास सर्वसामान्य प्रवासी तयार नाहीत. तरीही मध्य रेल्वेच्या मानाने पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलला थोडेतरी प्रवासी लाभत आहेत. लवकरच तिकिटाच्या फरकाची रक्कम आयत्यावेळी भरून एसी लोकलमधून फर्स्ट क्लास व सेकंड क्लासच्या प्रवाशांना थेट प्रवास करता येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर सोमवार, 22 नोव्हेंबरपासून आठ एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे ‘परे’च्या एकूण एसी लोकल फेऱ्यांची संख्या 20 इतकी होणार आहे. आठ फेऱ्यांपैकी चार फेऱ्या डाऊन दिशेला तर चार फेऱ्या अप दिशेला चालविण्यात येणार आहेत. अप दिशेच्या चार फेऱ्यांपैकी एक विरार आणि चर्चगेटदरम्यान, दोन बोरिवली आणि चर्चगेटदरम्यान तसेच एक गोरेगाव आणि चर्चगेटदरम्यान चालविण्यात येणार आहेत. तर डाऊन दिशेच्या चार फेऱ्यांपैकी एक चर्चगेट आणि नालासोपारादरम्यान, दोन चर्चगेट आणि बोरिवलीदरम्यान आणि एक चर्चगेट आणि गोरेगावदरम्यान चालविण्यात येणार आहे. तर दोन फेऱ्या पिकअवरमध्ये चालविण्यात येणार असून त्यातील एक अप दिशेला तर एक डाऊन दिशेला चालविण्यात येणार आहे.
या फेऱ्या रद्द होणार
वेळापत्रकात सुसूत्रता आणण्यासाठी चर्चगेट आणि वांद्रे दरम्यानच्या दोन धिम्या लोकल रद्द करण्यात येतील. चर्चगेट ते वांद्रेसाठी स. 9.07 वा. सुटणारी धिमी लोकल ट्रेन रद्द करण्यात येणार आहे आणि वांद्रे ते चर्चगेटकरिता स. 9.47 वा. सुटणारी धिमी लोकल रद्द होणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील रोजच्या एकूण फेऱ्यांची संख्या 1367 वरून 1373 इतकी होणार आहे.

























































