परतीच्या पावसाचा आंब्याला बसणार फटका, मोहोर येण्यास लागणार वेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परतीचा पडत असलेला अवेळी पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेती, भाजीपाला याचे नुकसान झाले आहे. तसेच चक्रीवादळही होत असल्याने वातावरणात बदल झालेला आहे या बदलत्या वातावरणाचा फटका यावेळी आंब्यालाही पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरीही चिंतेत सापडला आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास मोहोर येण्याचा कालावधी लांबणीवर जाण्याची भीती आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आंब्याला बाजारात पाहिजे तसा भाव मिळणार नसल्याची चिंताही शेतकऱ्यांना सतावत आहे.

जून ते सप्टेंबर हा पावसाचा हंगाम आहे. मात्र यावेळी ऑक्टोबर महिना संपला तरीही जिल्ह्यात पावसाने अद्याप उसंत घेतलेली नाही. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन आधी क्वार वादळ तर आता पुन्हा महा चक्रीवादळ होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. थंडीचा मौसम सुरू झाला तरी पाऊस अद्याप गेलेला नाही. पाऊस पडत असल्याने जमिनीवरील ओलावा कायम राहिल्यास याचा परिणाम आब्यांच्या मोहोरावर होणार आहे.

आंब्याला मोहोर धारणप्रक्रिया सुरु होण्यासाठी ठराविक तापमानाची गरज असते. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे  हा कालावधी लांबणीवर पडेल अशी शंका येथील आंबा बागातदार व्यक्त करीत आहेत. साधारणपणे सप्टेंबर अखेर पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र या वर्षी नोव्हेंबर महीना सुरु झाला तरीही पावसाच्या सरी सुरुच आहेत. पावसाचे वेळापत्रक दोन महिने पुढे सरकत असल्याने आंबा मोहोराचा हंगाम ही पुढे सरकण्याची शक्यता आहे. इतक्या उशीराने येणारा आंबा, बाजारात दाखल होण्यासही वेळ लागणार आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार नसल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

पाऊस असाच राहिल्यास मोहोर येण्यास वेळ लागणार आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा मोहोरवर होण्याची शक्यता आहे.
-पांडूरंग शेळके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी