कुस्तीपटू अन् बृजभूषण यांच्यातील ‘दंगल’ थांबेना!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह आणि महिला कुस्तीपटू यांच्यातील ‘दंगल’ काही थांबण्याची चिन्हे दिसेनात. बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱया कुस्तीपटूंच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला आता 16 दिवस झालेत. बृजभूषण सिंह हे सत्ताधारी पक्षाचे खासदार असल्याने भाजपची गोची होताना दिसत आहे. दुसरीकडे कुस्तीपटूंना पाठिंबा रोज वाढत असल्याने हे आंदोलन चिघळत चालले आहे.

शेतकऱ्यांनी तोडले बॅरिकेड्स
महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोठा जत्था सोमवारी जंतरमंतरवर धडकला. आंदोलनाच्या ठिकाणी जबरदस्त बॅरिकेडिंग करण्यात आले होते, मात्र शेतकऱयांनी ते बॅरिकेड्स तोडून आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची भेट घेतली. पोलिसांनी शांतपणे हे प्रकरण हाताळल्याने फारशी बाचाबाची झाली नाही. बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई झाली नाही तर 21 मे रोजी पुन्हा खाप महापंचायत बोलावून मोठा निर्णय घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

समर्थन दिल्याने तीन पदाधिकाऱयांवर कारवाई
हरयाणातील झज्जर, नूंह व हिसार येथील जिल्हा कुस्ती संघटनेच्या सचिवांनी महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला समर्थन दिले म्हणून त्यांच्यावर हरयाणा हौशी कुस्ती महासंघाने (एचडब्ल्यूए) कारवाई केली आहे. राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. ‘एचडब्ल्यूए’चे प्रदेशाध्यक्ष रोहतास नांदल यांनी झज्जर जिल्हा कुस्ती संघाचे सचिव वीरेंद्र सिंह दलाल, हिसार जिल्हा कुस्ती संघाचे सेव्रेटरी संजय सिंह मलिक व मेवात जिल्हा कुस्ती संघाचे सचिव जय भगवान यांना पदावरून निलंबित केले आहे. जंतरमंतरवर जाऊन महिला कुस्तीपटूंना समर्थन दिल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.