
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ओमानमध्ये पोहोचल्यावर ओमानच्या उपपंतप्रधानांनी स्वतः विमानतळावर त्यांचे स्वागत केले, जिथे त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ आणि पारंपारिक नृत्याने मानवंदना देण्यात आली. मात्र, या स्वागतापेक्षा सोशल मीडियावर मोदींच्या उजव्या कानातील एका छोट्या चमकणाऱ्या वस्तूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या कानाचा फोटो व्हायरल झाला आहे. अनेकांनी ही मोदींची नवी स्टाईल किंवा ‘इअररिंग’ असल्याचे तर्क लावले.
मोदींच्या कानात नेमके काय आहे असा प्रश्न विचारला जात आहे. मोदींचे पेहराव हे नेहमीच चर्चेचा विषय असतात, त्यामुळे अनेकांना ही फॅशन वाटली. मात्र, बारकाईने पाहिल्यावर असे लक्षात आले की, ते कोणतेही दागिना नसून एक ‘रिअल-टाइम ट्रान्सलेशन डिव्हाईस’ (त्वरित भाषांतर करणारे उपकरण) आहे. इंग्रजी किंवा अन्य भाषेत होणाऱ्या उच्चस्तरीय राजनैतिक बैठकांमध्ये संभाषणात अडथळा येऊ नये म्हणून अशा उपकरणांचा वापर केला जातो.
ओमानची अधिकृत भाषा अरबी आहे. ओमानचे उपमुख्यमंत्री सय्यद शिहाब बिन तारिक अल सैद यांच्याशी संवाद साधताना भाषेची अडचण येऊ नये, यासाठी मोदींनी हे भाषांतर यंत्र लावले होते.
ऐन संसदेच्या काळातच पंतप्रधान मोदींचे विदेश दौरे कसे ठरतात असा विषय देखील सोशल मीडिया आणि वृत्तपत्रातून चर्चिला गेला.
दरम्यान, हिंदुस्थान-ओमान दरम्यान मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे हिंदुस्थानच्या ९८% निर्यातीला ओमानमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. बदल्यात हिंदुस्थानवर ओमानमधून येणाऱ्या खजूर आणि मार्बल (संगमवरवर) वरील शुल्क कमी करणार आहे.





























































