जगातील सर्व मधमाशा नष्ट झाल्या तर भविष्यात होऊ शकतात मोठा बदल, वाचा संशोधकांचे उत्तर

जगभरात ‘मधमाशी’ या विषयावर अनेक संशोधन आणि अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात बऱ्याचशा तज्ज्ञांनी मधमाशांचे अस्तित्व धोक्यात असल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्षात खरंच मधमाशा पृथ्वीवरून दिसेनाशा झाल्या तर काय होईल. फक्त शुद्ध मध खायला मिळणार नाही, असे अनेकांना वाटू शकते, मात्र हा तुम्हाला माहित आहे का की, हा एक छोटासा प्राणी नाहीसा झाल्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक मोठे बदल होऊ शकतात? कसे, ते जाणून घेऊया…

पृथ्वीवरील प्रत्येक जीव इकोसिस्टिमअंतर्गत म्हणजे जैव साखळीप्रमाणे सर्व सजीव एकमेकांवर कोणत्या ना कोणत्या मार्गाने अवलंबून असतात. 2017 मध्ये युनायटेड नेशन्सनेदेखील इकोसिस्टम, अन्न उत्पादन आणि एकूण जैवविविधतेसाठी मधमाशांचे महत्त्व समजून घेण्यावर भर दिला.

मध तयार करण्याबरोबरच परागीभवनातही मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावतात. परागीभवन ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये फुलांमधील परागकणांचे हस्तांतरण केले जाते. हे काम फुलपाखरे, भुंगा आणि मधमाशांसह इतर कीटक करतात. जगातील प्रमुख पिकांपैकी सुमारे 75% पिके मोठ्या प्रमाणात मधमाश्याच्या परागकणांवर अवलंबून असतात. या पिकांमध्ये आपल्या पौष्टिक आहाराचा महत्त्वाचा भाग असलेल्या भाज्या आणि फळे इत्यादींचा समावेश होतो.

ब्रिटानिकाच्या अहवालानुसार, जगात मधमाशांच्या सुमारे 20,000 प्रजाती असून त्या परागकण गोळा करण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे, मात्र आता जगभरातील सर्व जातीच्या मधमाशा कमी होत आहेत. जगभरातील अनेक प्रकारचे धान्य आणि वनस्पती यांच्यामधील परागीभवनाची प्रक्रिया मधमाशांद्वारे होत असते. मधमाशा फुले आणि वनस्पती यामधील एक तृतीयांश परागकण गोळा करतात. त्या नष्ट झाल्या तर अनेक मोठे बदल भविष्यात होऊ शकतात.

जैवविविधतेवर प्रभाव
जर मधमाश्या नसतील तर फुले आणि वनस्पतींमधील विविधता कमी होईल. त्या वनस्पतींवर अवलंबून असलेल्या सजीवांच्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो.

अन्न उत्पादनात घट
मधमाशांच्या नष्ट होण्याचा थेट परिणाम पीक उत्पादन आणि कृषी उत्पादकतेमध्ये मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यामुळे अन्नधान्य उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. टोमॅटो, सफरचंद, बदाम आणि कॉफी यासारखी अनेक पिके आहेत जी प्रामुख्याने मधमाश्यांच्या परागीभवनावर अवलंबून असतात.

पर्यावरणीय असंतुलन
मधमाशांच्या परागीभवनावर अवलंबून असलेल्या वनस्पती नामशेष होऊ शकतात. ही प्रक्रिया जैवसाळखीप्रमाणे असते. एक साखळी चुकली तरी संपूर्ण साखळी नष्ट होऊ शकते. वनस्पती नाहीशा झाल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या जीवांवरही परिणाम होण्याची शक्यता असते. यामध्ये मानवांचाही सहभाग असेल.