
हिंदुस्थानातील व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. चॅटींग, फोटो-व्हिडीओ शेअरींगसाठी Whatsapp हे महत्वाचे साधन बनले आहे. व्हॉट्सअॅप हे आता चॅटिंग आणि मीडिया फाईल शेअर करण्याइतकेच आता मर्यादित राहिलेले नसून ऑनलाईन पेमेंटसाठी देखील तुम्ही व्हॉट्सअॅपचा वापर करु शकता. तुम्ही जर व्हॉट्सअॅप पे यूजर असाल तर तुमच्यासाठी व्हॉट्सअॅपने एक खूशखबर दिली आहे.
व्हॉट्सअॅप हिंदुस्थानातील यूजर्सला 105 रुपये कॅशबॅक देत आहे. तुम्ही WhatsApp पे चा वापर करत असाल तर 105 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकता. युपीआयद्वारे पैशांची देवाणघेवाण करणाऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी व्हॉट्सअॅपने (WhatsApp) कॅशबॅकची योजना केली आहे. सध्या हिंदुस्थानात पेमेंट अॅपच्या क्षेत्रात व्हॉट्सअॅपची स्पर्धा Google pay, Phonepe Amazon Pay सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी असणार आहे. यामुळे व्हॉट्सअॅपने नवीन कॅशबॅक योजनेद्वारे अधिकाधिक ग्राहक जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
व्हॉट्सअॅप पे योजनेअंतर्गत पहिल्या व्यवहारासाठी 105 रुपये कॅशबॅक देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापुढील तीन पेमेंटसाठी 35 रुपये कॅशबॅक देण्यात येणार आहे. विशेष बाब ही आहे की कॅशबॅक योजनेअंतर्गत किमान रकमेची अट ठेवण्यात आलेली नाही. तुम्ही WhatsApp पेमेंटच्या माध्यमातून फक्त 1 रुपया पाठवून देखील 35 रुपये कॅशबॅकचा फायदा घेऊ शकता असं सांगण्यात आलं आहे. मात्र ही कॅशबॅक ऑफर मर्यादित कालावधीसाठी आणि ठराविक ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे.


























































