सामना ऑनलाईन ।नवी दिल्ली
कर्जाचे हप्ते थकविणाऱ्या थकबाकीदारांना देशातील बँकांनी आता व्हॉटस्ऍप व ई-मेलच्या माध्यमातून नोटिशीचे मेसेज पाठविण्याचे ठरविले आहे. बँकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष केल्यास कर्जदाराला त्याचा भुर्दंड बसू शकतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर बँकांनी थकबाकीदारांना ऑनलाइन नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. एचडीएफसी बँक सध्या कर्जदार व थकबाकीदारांना व्हॉटस्ऍप मेसेज पाठवीत आहे.
व्हॉटस्ऍपने पाठविण्यात येणाऱ्या संदेशांना फारसा वेळ लागत नाही, तसेच तो ग्राहक अथवा कर्जदाराला मिळाला की नाही याची खातरजमाही त्वरित होते. ग्राहकाला बँकेचा असा व्हॉटस्ऍप किंवा ई-मेल मेसेज आल्यानंतर त्याने तातडीने कार्यवाही केली नाही तर त्याला कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागेल.
अनेकदा ग्राहक अथवा कर्जदार घर बदलतात. त्यामुळे त्यांचा पत्ताही बदलतो, मात्र फोन नंबर किंवा ई-मेल सहसा बदलत नाही. व्हॉटस्ऍपवर निळ्या रंगाचे साइन आले की ग्राहकाने मेसेज वाचलाच नाही अशी सबब तो पुढे करू शकत नाही. गेल्या दोन महिन्यांत बँकेने 214 ग्राहकांना व्हॉटस्ऍप व ई-मेलद्वारे नोटीस बजावली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
बँका आपल्या कायदेशीर नोटिसा व्हॉटस्ऍपच्या माध्यमातून पाठवू शकतात असे मुंबई उच्च न्यायालयाने जूनमध्ये दिलेल्या एका निकालात स्पष्ट केले होते. एसबीआय कार्डस् व पेमेंट सर्व्हिस आणि रोहिदास जाधव यांच्यात सुरू असलेल्या एका खटल्यात न्यायालयाने हा निर्णय दिला होता. एसबीआयकडे जाधव यांचा मोबाईल नंबर असल्याने बँकेने त्यांना त्यांच्या व्हॉटस्ऍपवर पुढील सुनावणीची तारीख कळविली होती. व्हॉटस्ऍपवर मेसेज मिळाला व तो वाचण्यातही आला. त्यामुळे मेसेज मिळालाच नाही असे ग्राहक अथवा कर्जदाराला म्हणता येणार नाही, असे मत न्यायालयाने निकालात नोंदविले होते.



























































