
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन झाले आहे. 2012 साली ते राष्ट्रपतीपदी विराजमान झाले होते. 2017 साली ते या पदातून मुक्त झाल्यानंतर सार्वजनिक जीवनातून त्यांनी निवृत्ती जाहीर केली होती. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वी प्रणब मुखर्जी यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली होती. ही भेट म्हणजे बंगाली वाघाला मराठी वाघाचा पाठिंबा आहे अशी आठवण मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात नमूद केली होती.
2012 च्या राष्ट्रपती निवडणुकीत प्रणब मुखर्जी हे संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार होते. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार पी ए संगमा होते. तेव्हा शिवसेना आणि भाजपची युती होती. तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रणब मुखर्जी यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. तसेच शिवसेनाप्रमुखांनी मुखर्जी यांना आपल्या निवासस्थानी ‘मातोश्री’त आमंत्रित केले होते. तेव्हा मुखर्जी यांनी शिवसेनाप्रमुखांचा मान राखला. शरद पवारांनी मुखर्जी यांना मातोश्रीत आणले होते. शिवसेनाप्रमुखांनी मुखर्जी यांचे आदरातिथ्य केले आणि महाराष्ट्राच्या या वाघाचा बंगाली वाघाला पाठिंबा आहे असे म्हटले. मुखर्जी यांनी द कोइलेशन इयर्स 1996-2012 या पुस्तकात हा किस्सा नमूद केला आहे.

























































