
ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती द्विशतकी खेळीने ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे आणि त्यांची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची उपांत्य लढतही. या दोन्ही संघांच्या अखेरच्या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी त्यांचे दुसरे आणि तिसरे स्थान निश्चित असेल. आता विषय फक्त उरला आहे चौथ्या स्थानाचा. या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला समान संधी आहे. जो संघ चौथे स्थान पटकावेल तो हिंदुस्थानशी भिडेल, पण यातही जर पाकिस्तान चौथा आला तर हिंदुस्थानचा उपांत्य सामना कोलकात्यात रंगेल आणि जर न्यूझीलंड किंवा अफगाणने यश मिळविले तर हिंदुस्थानची गाठ त्यांच्याशी वानखेडेवर पडेल. चौथ्या क्रमांकाचे समीकरण अद्यापही गुलदस्त्यात असल्यामुळे वानखेडेवर उपांत्य सामना कोणाचा या प्रश्नाचे उत्तर 11 नोव्हेंबरपर्यंत कुणाकडेही नसेल.
हिंदुस्थानने आठही सामने जिंकत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे तर आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया प्रत्येकी 12 गुणांवर आहेत. अन्य तीन संघ प्रत्येकी आठ गुणांवर स्थिर आहेत. त्यामुळे आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अखेरचा सामना हरो किंवा जिंको, हेच दोन्ही संघ दुसऱया आणि तिसऱया स्थानावर कायम असतील. त्यामुळे त्यांच्यातील उपांत्य लढत आधीच निश्चित झाली आहे.
तीन संघ आणि चौथे स्थान
अव्वल असलेला हिंदुस्थान आपला उपांत्य सामना चौथ्या क्रमांकाच्या संघाशी खेळणार आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यापैकी एकच संघ चौथ्या स्थानावर जाण्याची शक्यता आहे. चौथ्या स्थानाची सर्वात मोठी संधी न्यूझीलंडला आहे. त्यांना दुबळय़ा श्रीलंकेशी भिडायचे आहे. न्यूझीलंडचा खेळ पाहता पावसाची मेहेरबानी राहिल्यास ते लंकेचा पराभव करून आपले उपांत्य फेरीतील स्थान जवळजवळ निश्चित करू शकतात. कारण अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या तुलनेत नेट रनरेटमध्ये न्यूझीलंड खूपच पुढे आहे. जर न्यूझीलंडने श्रीलंकेचा 25 धावांनीही पराभव केला तरीही त्यांच्या नेट रनरेटला गाठण्यासाठी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला 150 पेक्षा अधिक धावांनी किंवा किमान 20 षटके राखत विजय मिळवावा लागणार आहे. हे आव्हान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसाठी खूपच अवघड असेल. कारण अफगाणिस्तानचा सामना आफ्रिकेशी आहे तर पाकिस्तान इंग्लंडशी भिडणार आहे.
…तरच हिंदुस्थान वानखेडेवर
आयसीसीने वेळापत्रक जाहीर करतानाच स्पष्ट केले होते की, हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे संघ जर उपांत्य फेरीत आमनेसामने आले तर यांच्यातील लढत ईडन गार्डन्सवर खेळविली जाईल. मात्र अन्य कोणताही संघ हिंदुस्थानविरुद्ध खेळणार असेल तर तो सामना वानखेडेवरच खेळविला जाणार. एवढेच नव्हे तर पाकिस्तानचा संघ साखळीतच बाद झाला तरी हिंदुस्थानचा सामना वानखेडेवरच होणार आहे. त्यामुळे चौथ्या स्थानावर कोणता संघ आपले नाव नोंदवतो, यावरच वानखेडेवरच्या उपांत्य लढतीचे भवितव्य असेल.



























































