
नवरा-बायकोचं भांडण ही काही नवीन गोष्ट नाही; पण रूसमधील सेंट पीटर्सबर्ग या शहरात घडलेली एका जोडप्याच्या भांडणाची गोष्ट वाचाल तर थक्क व्हाल.
सेंट पीटर्सबर्ग येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारे ओल्गा वोल्कोवा आणि त्यांची पत्नी येवगेनी कार्लगिन या दोघांचे कुठल्या तरी कारणावरून भांडण झालं. भांडण इतके विकोपाला गेलं की, ते दोघेही भांडता भांडता एकमेकांना मारू लागले.
एकमेकांना मारत ते जोडपं घराच्या बाल्कनीपर्यंत येऊन पोहोचलं. बाल्कनीत उभे राहून जेव्हा दोघं आपसांत भांडत होते तेव्हा दोघेही तिथे लावलेल्या रेलिंगवर पडले. त्यामुळे रेलिंग तुटली आणि 25 फूट खोल जमीनीवर दोघंही पडले. त्यांना अचानक इमारतीवरून पडलेलं बघून त्यांच्याभोवती लोकांची गर्दी जमा झाली. लोकांनी लागलीच त्यांना रुग्णालयात दाखल केलं.
ज्यांनी ही दुर्घटना बघितली ते सांगतात की, बाल्कनीचं रेलिंग इतक्या सहजपणे तुटलं की, असं काही घडेल असं कोणाला वाटलंच नाही, तसेच त्या दोघांचे कडाक्याचे भांडण सुरू होतं, हे भांडण फारच विकोपाला गेल्यानेच ही घटना घडल्याचं त्यांच्या शेजाऱ्यांचं म्हणणे आहे. या नवरा-बायकोच्या भांडणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत येथील एका नागरिकानं स्थानिक पत्रकाराला सांगितलं की, मी माझ्या मित्रासोबत रस्त्यावरून जात होतो. यावेळी मित्र रस्त्याचा व्हिडिओ बनवत होता. तेव्हा एका इमारतीच्या बाल्कनीतून भांडणाचा आवाज ऐकू येऊ लागला. तेव्हा त्याचे लक्ष त्या दोघा भांडणाऱ्या पती-पत्नीकडे गेले आणि घटनेचा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये अनपेक्षितपणे चित्रित झाला. ही घटना घडल्यानंतर तेथे पोलीस अधिकारीही दाखल झाले. रेलिंग तुटलीच कशी ? याचा आम्ही शोध घेत आहोत, असे त्यांनी सांगितले.





























































