रिव्हॉल्व्हर खरे की खोटे हे पाहताना मानेत गोळी घुसली; अल्पवयीन मुलगी जखमी, केळवेच्या हॉटेलमधील घटना

प्रियकराच्या बॅगेत असलेले रिव्हॉल्व्हर खरे की खोटे हे पाहत असताना अचानक ट्रिगर दाबला गेला आणि गोळी थेट 17 वर्षीय मुलीच्या मानेत घुसली. ही घटना केळवे येथील एका हॉटेलमध्ये आज घडली. या प्रकारात मुलगी जबर जखमी झाली असून तिला बोईसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केळवे पर्यटनस्थळी आठवडाभरापूर्वी एका रिसॉर्टमध्ये विवाहित महिलेच्या संशयास्पद मृत्यूची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

केळवे येथील एका हॉटेलमध्ये बोईसर येथील 17 वर्षीय मुलगी तिचा प्रियकर दिनेश धोडी याच्याबरोबर आली होती. ती हॉटेलमधील रूममध्ये गेल्यावर धोडी हा शौचालयात गेला. त्यावेळी तिने त्याची बॅग तपासली असता त्यामध्ये तिला रिव्हॉल्व्हर आढळून आले. हे रिव्हॉल्व्हर खरे आहे की खोटे आहे हे तपासताना तिच्या हातून ट्रिगर दाबल्याने गोळी झाडली गेली. ही गोळी या मुलीच्या थेट मानेत शिरल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला प्रथम माहीम येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. नंतर तिला बोईसर बेटेगाव येथील लाईफ लाईन या रुग्णालयात हलवण्यात आले. तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.

नियमांची ऐसी तैसी
पालघर जिल्ह्यातील केळवे हे नामांकित पर्यटनस्थळ आहे. येथे हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. व्यावसायिकांनी पर्यटकांसाठी स्विमिंग पूलसह विविध सुविधा निर्माण केल्या आहेत. हॉटेल व्यावसायिकांनी आलेल्या ग्राहकांची योग्य तपासणी करून त्यांच्या वयाची खातरजमा करून मगच त्यांना रूम देणे अपेक्षित आहे, परंतु या नियमांना सर्वत्र डावलले जात आहे. त्यामुळे असे प्रकार या भागात मोठ्या प्रमाणात घडत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.