मुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य करताना राणेंनी भान ठेवायला हवे होते! केंद्रीय मंत्री नारायण राणेंची हायकोर्टाकडून कानउघाडणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने गोत्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलीच कानउघाडणी केली. राणे हे एका पक्षाचे जबाबदार नेते आहेत. तसेच ज्यांच्याविरोधात त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले तेदेखील राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य करताना राणेंनी जबाबदारीचे भान ठेवायला हवे होते, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी राणेंना फटकारले. इतकेच नव्हे तर राणेंनी कोर्टात येऊन जे झाले ते मान्य करायला हवे. यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो असे खडे बोलही सुनावले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणेंविरोधात धुळेसह पुणे, नाशिक, महाड पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 500,505(2),153 ब (1) (क) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीआरपीसी कलम 41 (अ) अंतर्गत पोलिसांनी 10 मार्च रोजी नोटीस बजावल्याने नारायण राणे यांनी अॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत अर्ज केला. या अर्जावर न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

शब्दें धन वाटू जन लोका 

सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी नारायण राणेंना संत तुकारामांच्या अभंगाचे उदाहरण दिले. ‘शब्दें धन वाटू जन लोका’ असे अभंगाच्या ओळी म्हणत नेत्यांनी तसे वागायला हवे, असे न्यायमूर्ती म्हणाले. राजकारणात प्रत्येकाचे आचार, विचार, दृष्टिकोन वेगवेगळे, भिन्न आणि परस्परविरोधी असू शकतात. मात्र राजकीय पुढाऱयाने मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना जबाबदारीने बोलणे आवश्यक आहे असे खंडपीठाने राणेंना सुनावले.