दिलासादायक! कोरोना महामारी संपल्यात जमा? तज्ज्ञांसोबत चर्चा करून WHO करणार घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना महामारीचा अंत जवळ आला असून लवकरच याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तज्ज्ञांशीही चर्चा सुरू केली आहे. दोन वर्षानंतर कोरोना महामारी संपल्याची घोषणा केल्यानंतर याचा जगावर काय प्रभाव पडेल आणि यातून याबाबतही WHO आणि तज्ज्ञांमध्ये चर्चा झाली.

हिंदुस्थानसह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. असे असले तरी महामारी अद्याप संपलेली नाही, कारण एकीकडे हाँगकाँगमध्ये मृत्यूदर वाढत आहे, तर दुसरीकडे दोन वर्षात पहिल्यांदाच चीनमध्ये 1 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना महामारी संपली हे कधी गृहित धरायचे आणि त्याचे संकेत काय याबाबत जागतिक आरोग्य संघटना तज्ज्ञांशी चर्चा करत आहे. कोरोना महामारी संपल्याची घोषणा करण्यासाठी आवश्यक मापदंडाची चाचपणी WHO सध्या करत आहे.

दोन वर्षात पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्णांची नोंद

हिंदुस्थानमध्ये रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. जानेवारीच्या सुरुवातीला तीन लाखांपार गेलेली रुग्णसंख्या आता हजारांमध्ये आली आहे. सोमवारी देशात 2503 कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या दोन वर्षाताली ही सर्वात कमी संख्या आहे. रुग्ण बरे होण्याचा दरही 98.71 वर पोहोचला आहे.

चीनमध्ये वेगाने लागण

चीनमध्ये कोरोना पुन्हा हातपाय पसरतो आहे. चीनमध्ये रविवारी जवळपास 3300 कोरोना बाधितांची नोंद झाली. गेल्या दोन वर्षात एका दिवसात सापडलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यामुळे अनेक शहरांमध्ये निर्बंध कडक करण्यात आले असून शांघाईमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शेनझेन शहरामध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.

हाँगकाँगची स्थिती बिकट

चीनप्रमाणे हाँगकाँगमधील परिस्थिती वेगाने खराब होत आहे. हाँगकाँगमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 27647 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 87 रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. त्यामुळे येथील मृतांचा आकडा 3729 वर पोहोचला आहे.