नवीन विभागीय आयुक्त कोण?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
डॉ. पुरुषोत्तम भापकर व सुनील केंद्रेकर

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

विद्यमान विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर पुढील महिन्यात निवृत्त होत असल्याने आता नवीन विभागीय आयुक्त कोण, याची उत्सुकता महसूल कर्मचाऱ्यांमध्ये वाढली आहे. दहा महिन्यांपूर्वी सुनील केंद्रेकर यांची या पदावर बदली करण्यात आली होती, मात्र काही तासांतच ही बदली रद्द करण्यात आली होती. त्यामुळे नवीन विभागीय आयुक्त म्हणून सुनील केंद्रेकर यांना नियुक्त केले जाणार की, नवीन अधिकाऱ्याकडे जबाबदारी दिली जाणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारने मार्च महिन्यात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये विद्यमान विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची २८ मार्च २०१८ रोजी मंत्रालयात कृषी विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली होती तर कठोर शिस्तीचे म्हणून ओळख असलेल्या सुनील केंद्रेकर यांना येथील विभागीय आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, वर्षभरावर निवृत्ती आल्याने डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी राजकीय वजन वापरून बदली रद्द केली होती. त्यामुळे सुनील केंदे्रकर यांना इतरत्र नियुक्ती देण्यात आली होती. फेब्रुवारीअखेरीस डॉ. पुरुषोत्तम भापकर निवृत्त होणार असल्याने सरकारला नवीन विभागीय आयुक्त द्यावा लागणार आहे. मार्च महिन्यात विभागीय आयुक्त म्हणून जबाबदारी दिलेल्या सुनील केंद्रेकर यांना पुन्हा नियुक्ती दिली जाणार की, इतर अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी दिली जाणार, याबाबत तर्कवितर्क मांडले जात आहेत.

मराठवाड्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. फेब्रुवारीपासून दुष्काळ रौद्ररूप धारण करणार, हे स्पष्टच आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या दुष्काळाला हाताळण्यात हयगय झाल्यास त्याचे परिणाम निवडणुकीत दिसून येणार आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत कठोर शिस्तीचा अधिकारीच विभागीय आयुक्तपदावर विराजमान होणे गरजेचे आहे. दुष्काळासोबतच आगामी लोकसभा निवडणुका निर्विघ्न पार पाडण्याची जबाबदारी पेलण्याचे आव्हान नवीन विभागीय आयुक्तांवर राहणार असल्याने याचा विचार करूनच सरकारकडून नवीन विभागीय आयुक्तांची नेमणूक केली जाईल, अशी चर्चा आयुक्तालयात रंगली आहे.