टेन्शन! कोरोनापेक्षा खतरनाक रोगाची साथ येणार; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूने जगाला हैराण करून सोडले असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) कोरोनापेक्षाही खतरनाक रोगाची साथ येणार असल्याचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या विषाणूपेक्षाही वेगाने संसर्ग पसरवण्याची क्षमता या नव्या रोगाच्या विषाणूमध्ये असल्याचे डब्लूएचओचे महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्रेयिसस यांनी सांगितले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संस्थेची 74 वी वार्षिक सभा नुकतीच पार पडली. त्या सभेच्या उद्घाटनपर भाषणात टेड्रोस यांनी हा इशारा दिला. या सभेला जगातील 194 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोनामुळे धोकादायक बनलेली परिस्थिती अजूनही कायम असल्याचे टेड्रोस यांनी सांगितले.

सर्वात कमजोर लोकांना वाचवणे हा विषाणूवर विजय मिळवण्याचा एकमेव उपाय असल्याचे टेड्रोस याप्रसंगी म्हणाले. सर्वात कमजोर असलेल्या लोकांना सर्वात आधी मदत पोहोचवून त्यांना मजबूत केले तर आपल्या सर्वांचा निश्चितच विजय होईल असे ते म्हणाले. जगातील गरीब देशांना कोरोनाविरुध्द लढण्यासाठी मदत पुरवण्याची गरज असल्याचे संकेत त्यांनी त्यातून दिले.