‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तज्ज्ञांनी दिला सावधानतेचा इशारा, जाणून घ्या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब केला असल्याने प्रत्येक जण घरात बसूनच काम करतोय. तर काहीजण अद्यापही कोरोनाच्या भीतीने बाहेर पडत नाहीत. त्यामुळे हे लोक सूर्यप्रकाशापसून दूर राहात आहेत. पुरेसा सूर्यप्रकाश आणि संतुलित आहाराच्या अभवामुळे या लोकांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वांची कमतरता असल्याचे दिसून येत आहे. नियमित वैद्यकीय चाचणीसाठी येणाऱ्या दहापैकी सात तरुणांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव असल्याचे आढळून येत आहे.

आहारात कॅल्शियम शोषण्यासाठी शरीराला ड जीवनसत्त्वाची गरज असते. परंतु ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे आहारातून कॅल्शियमचे अपुरे शोषण होते. या परिस्थितीत शरीराला हाडांमध्ये साठलेले कॅल्शियम वापरावे लागते. त्यामुळे हाडे कमकुवत होत जातात.

शरीराला आवश्यकतेनुसार ‘ड’ जीवनसत्व मिळाल्यास मेंदूशी संबंधित विकार, ह्रदयरोग, टाइप-2 मधुमेह, उच्च रक्तदाब, ऑस्टियोपोरोसिस, हाडांचे फ्रॅक्चर, लठ्ठपणा व कर्करोग यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. त्यामुळे ‘ड’ जीवनसत्व शरीराला अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी शरीराला आवश्यक सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे आहे व त्यासाठी प्रत्येकाने सकाळच्यावेळी किमान अर्धा तास सूर्यप्रकाशात राहणं आवश्यक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

जनरल फिजिशियन डॉ. संजय नगरकर म्हणाले, सध्या रुग्णालयात येणाऱ्या बहुतांश लोकांमध्ये व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरतेची समस्या दिसून येत आहे. अनेक लोक अद्यापि घराबाहेरच पडत नसल्याने ही समस्या उद्भवत आहे. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत योग्य तो बदल करणं गरजेचं आहे.

‘वर्क फ्रॉम होम तसेच कोरोनामुळे अनेकजण घराबाहेरच पडत नाहीत. त्यामुळे व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरता भासू लागली आहे. परिणामी पाठदुखी, हाडांचे दुखणे, थकवा, जळजळ, नैराश्य, त्वचेच्या तक्रारी जाणवत आहेत. सध्या आमच्याकडे वैद्यकीय चाचण्यासाठी येणाऱ्या दहापैकी सात लोकांमध्ये व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरता दिसून येत असल्याचे पॅथॉलॉजिस्ट डॉ. कीर्ती कोटला यांनी सांगितले.

‘ड’ जीवनसत्व मिळवण्यासाठी हे करा

सकाळच्या कोवळ्या उन्हात अर्धा तास चालणे, आहारात मासे, ताजे लोणी, चीज, मशरुम, अंड्यातील पिवळा भाग, सोयाबीन, दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.