
शारीरिक दुर्बलतेमुळे रडत बसण्यापेक्षा येणाऱया संकटाचा धैर्याने सामना करणाऱया मुलाची कहाणी सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत आहे. परवेझ अहमद असे या मुलाचे नाव असून तो जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा जिह्यात राहतो. परवेज एकाच पायावर रोज दोन किलोमीटर अंतर चालत शाळेला जातो.
नौगाम मावर गावातील परवेझला दुर्घटनेत एक पाय गमवावा लागला. परवेझ हा सध्या 9 वीच्या वर्गात शिकत आहे. कडक हिवाळ्यात कश्मीरमध्ये प्रत्येक घरात शेकोटी केली जाते. 2009 साली परवेझच्या घरीदेखील अशीच शेकोटी करण्यात आली होती. शेकोटीच्या आगीत परवेझ भाजला होता. डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवले, पण त्याचा एक पाय कापावा लागला.
एक पाय नसला तरी परवेझने शिक्षणाची जिद्द सोडलेली नाही. उलट आणखी जिद्दीने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो रोज दोन किलोमीटर चालत जातो आणि परत दोन किलोमीटर चालत शाळेतून घरी येतो, असे रोज चार किलोमीटर अंतर तो एका पायावर चालतो. परवेझचे प्रथामिक शिक्षण सरकारी शाळेत झाले, परंतु पाचवीनंतर त्याला आपल्या घरापासून दोन किलोमीटर अंतर असलेल्या हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यावा लागला. शिक्षण विभागाने स्थानिक समाज कल्याण विभागामार्फत आवश्यक सहकार्य करून त्याला मोफत व्हीलचेअर दिली, परंतु त्याचे डोंगरावरचे गाव आणि शाळेतील खराब रस्ता यामुळे व्हीलचेअरचा उपयोग होत नाही.



























































