
’स्टार प्रवाह’वरील ’मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना मालिकेतून तडकाफडकी बाहेर काढण्यात आले आहे. राजकीय भूमिका मांडल्यामुळे आपल्याला मालिकेतून काढल्याचा आरोप किरण माने यांनी केला आहे. दरम्यान, किरण मानेंविरोधात वाहिनीने केलेल्या कारवाईवरुन सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक चाहत्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला असून या कारवाईला ’सांस्कृतिक दहशतवाद’ म्हटले आहे.
कारवाईबाबत आपली भूमिका मांडताना किरण माने म्हणाले, ’शूटिंग संपल्यावर अचानक मला निर्मिती संस्थेकडून पह्न आला आणि मालिकेतून बाहेर करण्यात आल्याचे सांगितले. राजकीय पोस्ट करतो म्हणून एका महिलेने माझ्याविरोधात तक्रार केली होती असे चॅनेलमधील एका मित्राने मला सांगितले.’ अलीकडेच किरण माने यांनी ’आम्ही दोन प्रेक्षक असले तरी प्रयोग करतो…’ अशी पोस्ट केली होती. यावरून त्यांना ट्रोल करण्यात आले. मात्र, पोस्टमध्ये आपण कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नसल्याचे माने यांनी म्हटले आहे.
‘राजकीय’ नव्हे तर ’प्रोफेशनल’ कारणामुळे डच्चू!
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निर्मात्या सुझाना घई म्हणाल्या, ’किरण माने यांना राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर प्रोफेशनल कारणांमुळे बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्या राजकीय भूमिकेचा आणि त्यांना मालिकेतून काढण्याचा काडीमात्र संबंध नाही. प्रोफेशनल कारणांमुळे त्यांना रिप्लेस केले आहे. त्यामागची कारणे काय होती हे माने यांना माहित होते. त्या कारणांबाबत त्यांना अनेकदा माहिती दिली गेली होती. अनेकदा सांगूनही त्या कारणांवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला’.



























































