
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
अनैतिक संबंधात अडथळा येत असल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केल्याची घटना कोपरगाव तालुक्यात कोळपेवाडी येथे घडली. अनिल बाबासाहेब घुसळे (36) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती तालुका पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी दिली. पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्षनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल घुसळे आणि रमा घुसळे हे दोघे पती-पत्नी कोपरगाव तालुक्यात कोळपेवाडी येथील रहिवासी आहेत. रमा हिचे बाळू खंडवे याच्याशी अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधास पती अनिल अडथळा ठरत असल्याने दोघांनी त्याला संपवण्याचा प्लॅन केला. या दोघांच्या मदतीला विलास कुवारे (41) हा देखील होता. 25 ऑगस्ट रोजी रात्री आरोपींनी अनिल याला घरातून बाहेर बोलावले आणि गळा आवळून त्याची हत्या केली. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह जवळच असणाऱ्या विहिरीत फेकला. या प्रकरणी अनिलची आई आणि रमा हिची सासू विमल घुसळे यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी बाळु खंडवे आणि विलास पुंजाराम कुवारे यांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोघांनाही 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आधी दरोडा आणि खून, कोपरगाव भयभीत
कोळपेवाडी परिसरात ऐन बाजाराच्या दिवशी 19 ऑगस्टला 14 ते 20 जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकीत 28 लाखांची लूट केली होती. यावेळी झालेल्या गोळीबारात श्याम घाडगे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला 11 दिवस उलटून गेले असले तरी अद्याप तपास लागलेला नाही. त्यातच ही खुनाची घटना घडल्याने कोळपेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
























































