गरोदर असताना पोटावर मारल्या लाथा, अभिनेत्याच्या पत्नीचा गंभीर आरोप

123

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आपला नवरा बाहेरख्याली असून त्याला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याने आपल्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप एका अभिनेत्याच्या पत्नीने केला आहे. गर्भवती असूनही त्याने मारहाण केली आणि आपल्या पोटावरही लाथा मारल्याचं या महिलेचं म्हणणं आहे.

हा अभिनेता पाकिस्तानी असून त्याचं नाव मोहसिन अब्बास हैदर असं आहे. पाकिस्तानमध्ये तो अभिनेता, गायक आणि मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची पत्नी फातिमा सोहेल हिने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल करून तिने हे आरोप केले आहे. तिच्या म्हणण्यानुसार, 26 नोव्हेंबर 2018 रोजी तिने आपल्या नवऱ्याला एका परस्त्रीसोबत रंगेहात पकडलं. पण, यावर पश्चात्ताप करण्याऐवजी मोहसिनने तिला मारहाण केली. तिचे केस ओढून तिला जमिनीवर पाडलं आणि तिला लाथा मारायला सुरुवात केली. गरोदर आहे हे माहीत असूनही त्याने पोटावर लाथा मारल्या. तोंडावरही ठोसे मारले आणि तिथून निघून गेला. या घटनेनंतर मानसिक धक्क्यात असल्याने मी कोणालाही काहीही सांगितलं नाही, असं फातिमाचं म्हणणं आहे.

फातिमाने पुढे म्हटलं आहे की, सुदैवाने या घटनेत माझ्या पोटातील बाळाला काहीही इजा झाली नाही. मला 19 मे रोजी मुलगा झाला. पण जेव्हा मी बाळंतवेदना सहन करत होते तेव्हा माझा नवरा त्याच्या प्रेयसीसोबत होता. मुलगा झाल्याचं कळताच तो दोन दिवसांनी रुग्णालयात आला आणि फक्त बाळासोबत फोटो काढून निघून गेला. फक्त प्रसिद्धीसाठी तो फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. डिस्चार्ज मिळताच मी बाळाला घेऊन त्याला भेटायला गेले तेव्हाही त्याने मला मारहाण केली असा आरोप फातिमाने केला आहे. त्याच्याविरुद्ध आता कोर्टात धाव घेणार असल्याचंही फातिमाचं म्हणणं आहे. दुसरीकडे मोहसिनने हे आरोप फेटाळले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या