बुद्ध पौर्णिमेला वन्यप्राणी गणनेची परंपरा यंदा खंडित, जंगलातील पाणवठ्याजवळील मचाण राहिले अबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला जंगलांमधील पाणवठय़ांवर येणाऱया वन्य प्राण्यांची गणना करण्याची कित्येक वर्षांची परंपरा यंदा प्रथमच खंडित होत आहे. वन विभाग, वन्यजीव विभागाच्या वतीने विविध सेवाभावी, निसर्गप्रेमी संस्थांच्या सहकार्याने राबवला जाणारा हा उपक्रम यावेळी कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे पाणवठ्याच्या जवळील मचाण अबोल राहिले. तर, जंगलवाटांवर फक्त वन्य प्राण्यांचेच अधिराज्य राहिले.

वैशाख पौर्णिमा तथा बुद्ध पौर्णिमेला वर्षातील या रात्री चंद्र अधिक प्रकाशमान दिसतो. त्यामुळे या पौर्णिमेला धरून चोवीस तासांत जंगलांमध्ये वन्य प्राण्यांची गणना केली जाते. कित्येक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. काही ठिकाणी बुद्ध पौर्णिमेला धरून पाच-सहा दिवस याप्रमाणेही वन्यप्राणी गणना केली जात असते. जंगलातील पाणवठय़ांजवळ बांधलेल्या मचाणावर बसून पाणवठय़ांवर येणाऱया वन्य प्राण्यांचे दर्शन अनुभवणे हा एक अविस्मरणीय असा अनुभव असतो. वन व वन्यजीव विभागाच्या या उपक्रमात निसर्ग व पर्यावरणप्रेमी मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.

यंदा कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जग थिजले आहे. ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनसारख्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. त्यामुळे लोकांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर यावेळी बुद्ध पौर्णिमेची वन्यप्राणी गणना रद्द करण्यात आली आहे. परिणामी ही अनेक वर्षांची परंपरा खंडित झाली. परिणामी बुद्ध पौर्णिमा असूनही पाणवठ्याच्याजवळील मचाण अबोल राहिले आणि जंगलवाटांवर केवळ वन्य प्राण्यांचेच अधिराज्य राहिले. कोरोनाने मानवी जीवन धोक्यात आले आहे, अशा स्थितीत कोरोनाची साखळी तोडण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

वन्यप्राण्यांविषयी आत्मीयता वाढावी यासाठी गणना

वन्यप्राणी गणना ही प्रामुख्याने राखीव क्याघ्र प्रकल्पात होते. या उपक्रमात लोकांचा सहभाग हा महत्त्वाचा उद्देश मानला जातो. पण, यावर्षी कोरोना संकटामुळे बुद्ध पौर्णिमेला होणारी ही वन्यप्राणी गणना करू नका, अशा सूचना विभागाकडून आल्या असल्याची माहिती सातारा जिल्ह्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली. गतवर्षीही बुद्ध पौर्णिमेला कोरोनाचे संकट होते. त्यावेळी बाहेरचे लोक न घेता विभागांतर्गत हा उपक्रम राबकला होता. वास्तविक पाठवठ्यावरील गणना ही जुनी संकल्पना आहे. केवळ जनरल ऑब्जर्व्हेशन किंवा ठोकताळा म्हणून त्याकडे पाहिले जाते. यातून प्राप्त होणारी माहिती आता कोठेही ग्राह्य धरली जात नाही. तथापि, लोकांचा उत्साह वाढावा, जंगल व वन्य प्राण्यांकिषयी आत्मीयता वाढावी, यादृष्टीने पाणवठ्याकरील गणना केली जाते. आता जास्त शास्त्रशुद्ध पद्धतीने कॅमेरा ट्रॅपिंग व लाईन ट्रँजेक्ट या दोन पद्धतीने गणना केली जाते. यापैकी रेषीय गणना साधारणतः जानेवारी ते मार्चदरम्यान झाली आहे. कॅमेरा ट्रॅपिंगचे कामही पूर्ण झाले आहे. दर दोन वर्षांनी त्याचा अहवाल प्रकाशित केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जतन व संवर्धनासाठी दिशादर्शन

या वन्यप्राणी गणनेतून केवळ संख्या मोजणे इतकाच उद्देश साध्य होत नाही, तर जंगलक्षेत्राचे अंतरंग, तेथील जैवविविधता, तेथे जाणवणारे बदल, वन्य प्राण्यांचे वर्तन आणि एकूणच जंगलाच्या हृदयाची स्पंदने जवळून अनुभवता येतात. त्यातून वन, पर्यावरण, जैवविविधता याच्या जतन व संवर्धनासाठी दिशादर्शन होत असते.