…तर दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार वेतनेतर अनुदानासाठी, संस्थाचालक आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 3 वर्षांपूर्वी शाळांना वेतनेतर अनुदान द्यावे असा निर्णय दिला होता; मात्र याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मार्चमध्ये होणाऱया दहावी व बारावी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संस्थाचालक संघटनेने घेतला आहे. एका आठवडय़ात अनुदानाची पूर्तता करावी अशी मागणी संस्थाचालकांनी केली आहे.

शासनाने वेतनेतर अनुदान दिलेच नाही. त्याचबरोबर शिक्षण हक्क कायद्यातंर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही दिलेली नाही. शाळांचे इमारत भाडेदेखील थकीत आहे. त्यामुळे संस्थाचालक आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. त्यामुळे त्वरित वेतनेतर अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे.

सरकारने ढवळाढवळ करू नये

पवित्र पोर्टलद्वारे जी शिक्षक भरती केली जात आहे तिचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे. त्यात विभागवार कार्यक्षेत्र असावे. त्या विभागात भरती करण्यास प्राधान्य असावे. तसेच या कामी शासनाने खासगी शिक्षण संस्थाच्या कारभारात ढवळाढवळ करु नये, अशा मागण्याही मंडळाने केल्या आहेत.