…तर भाजपसोबतच्या युतीबाबत पुनर्विचार करावा लागेल, मित्रपक्षाचा सूचक इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून येथे हिंसाचार सुरू आहे. यात 100हून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यानंतरही राज्यातील परिस्थिती सुधारलेली नाही. याच मुद्द्यावरून मणिपूर सरकारमध्ये भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेला मित्रपक्ष नाराज असून परिस्थिती सुधारली नाही तर भाजपसोबतच्या युतीबाबत पुनर्विचार करावा लागेल असे विधान माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) चे उपाध्यक्ष वाय. जॉयकुमार सिंग (Yumnam Joykumar Singh) यांनी केले आहे.

माध्यमांशी बोलताना वाय. जॉयकुमार सिंह म्हणाले की, मणिपूरमधील परिस्थिती सुधारली नाही तर भाजपसोबतच्या युतीबाबत पुनर्विचार करावा लागेल. आम्ही गप्प राहून हे पाहू शकत नाही. राज्यात सध्या कलम 355 लागू आहे. त्यामुळे लोकांचे संरक्षण करणे हे राज्य आणि केंद्राचे कर्तव्य आहे. मात्र हिंसाचार रोखण्यासाठी कोणतीही ठोस योजना बनवली जात नाहीय.

राज्यातील परिस्थिती सुधारेल अशी चिन्हे सध्यातरी दिसत नाहीय. परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे. आता तर जमावाने थेट केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह (Union Minister RK Ranjan) यांच्या घरावर हल्ला चढवलाय. त्यांच्या घरावर बॉम्ब फेकले. घर जाळण्यात आले. आज जमावाने केंद्रीय मंत्र्यांवर निशाणा साधलाय. उद्या ते आमदार, भाजप मंत्री आणि सहकारी पक्षांनाही टार्गेट करतील, अशी भीती वाय. जॉयकुमार सिंह यांनी व्यक्त केली.

मणिपूरचं काश्मीर व्हावं अशी सरकारची इच्छा! संजय राऊतांची सडकून टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याचाही काही फायदा झालेला नाही. पक्षाची विश्वासार्हता सध्या धोक्यात आली आहे. मणिपूरमध्ये कुणाचे नियंत्रण आहे? केंद्राचे की राज्याचे हा प्रश्न लोक विचारत आहेत. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती आहे. कोण प्रभारी आहे हे स्पष्ट व्हायला हवे अन्यथा स्थिती जैसे थे राहील. आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देत काय पाऊले उचलायला हवीत ते सांगितले आहे. सुरुवातीलाच हे प्रकरण योग्य योजना आखून हाताळायला हवे होते. सरकारने संवेदनशील क्षेत्रावर लक्ष द्यावे नाहीतर आम्हाला सरकारसोबत राहायचे की विरोधी पक्षासोबत जायचे यावर विचार करावा लागेल, असा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला.

मणिपूरमध्ये भाजप नेत्याचं घर पेटवून देण्याचा प्रयत्न, पुन्हा उसळला हिंसाचार

मैतेई आरक्षणावरून मणिपूर पेटले असून आठ जिल्ह्यांत हिंसाचार उसळला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून हा हिंसाचार सुरू असून आतापर्यंत 100हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती बिकट झाल्याने संपूर्ण राज्यात कलम 355 लागू करण्यात आले आहे. तसेच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलिसांसह लष्करी जवानांना तैनात करण्यात आले आहे.