
मिस्टर बिन हे नाव विसरता येणार नाही. अत्यंत सहज आणि बोलके हावभाव, चेहऱयाच्या विचित्र मुद्रा आणि निःशब्द अभिनय ही ताकद असलेल्या मिस्टर बिन या टेलिव्हिजन पात्राने अनेक पिढय़ांना पोटधरून हसवले.
यासंदर्भात मिस्टर बिन साकारणारे अभिनेते रोवन एटकिन्सन यांनी आपल्या 65 व्या वाढदिवसाला मोठी घोषणा केली. यापुढे मिस्टर बिन ही भूमिका साकारणार नाही, असं रोवन यांनी जाहीर केले. वाढदिवसाला मिस्टर बिन यांनी आपल्या पात्राला अलविदा केल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
मिस्टर बिन हे पात्र तणावपूर्ण आणि थकवणारे आहे. त्यामुळे ते अधिक जबाबदारीने साकारावे लागते. आता त्या पात्रात तेवढी मजा राहिली नाही. त्यामुळे यापुढे मिस्टर बिन हे पात्र साकारणार नाही, हे पात्र आता थांबायला हवं, असे एका मुलाखतीत रोवन यांनी सांगितले.
काल जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना रोवन एटकिन्सन यांनी चाहत्यांना हा धक्का दिला. रोवन यांनी अनेक सिनेमा, नाटकांत भूमिका साकारली आहे. मात्र ते मिस्टर बिन म्हणूनच ओळखले जातात.






























































