राष्ट्रवादीच्या ‘त्या’ 18 नगरसेवकांवर कठोर कारवाई करणार- शरद पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी ‘भाजप सोबत जाऊ नये’ असे आदेश दिले होते. मात्र नगर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत ते पाळले गेले नाही. त्यामुळे आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही. त्या सर्व नगरसेवकांना नोटिसा बजावल्या असून तीन-चार दिवसांमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. रविवारी नगर येथे जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार दिलीप वळसे, पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आदी उपस्थित होते.

नगरमध्ये महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षादेश धुडकावून खुलेआम भाजपला पाठिंबा दिला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या अभद्र युतीमुळे महापौर, उपमहापौर पद भाजपच्या पदरात पडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, भाजपाचे सरकार कायदा हातात घेऊन लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवीत आहे. त्यामुळे आम्ही भाजपबरोबर जाणार नाही अशी भूमिका पक्षाने घेतली होती. त्यामुळे पक्षादेश धुडकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.