
गोपीनाथ मुंडे यांच्या जंयतीच्या दिवशी गोपीनाथ गडावर मोठी सभा झाली. त्यात पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांनी आपली खदखद जाहीरित्या व्यक्त केली होती. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होत आहे असा आरोप पक्षावर झाला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात कुठल्याच प्रकारे ओबीसी नेत्यांवर अन्याय होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच नाराज पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा करू असेही फडणवीस म्हणाले.
टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला मुलाखत देताना फडणवीस यांनी म्हटले की, “12 डिसेंबरला झालेल्या सभेत भाजप नेत्यांनी जे वक्तव्य केले ते दुर्दैवी होते. आम्ही कधीच ओबीसी नेत्यांकडे दुर्लक्ष केले नाही. मी स्वतः माजी मंत्री पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा करेन.” त्यांचे जे काही प्रश्न असतील ते नक्की सोडवले जातील अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.




























































