विम्बल्डन टेनिस ग्रॅण्डस्लॅम कोरोनामुळे स्पर्धा रद्द, 620 टेनिसपटूंना मिळणार 94 कोटी

कोरोनामुळे या वर्षी विम्बल्डन ही हिरवळीकर खेळवण्यात येणारी टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा रद्द करण्यात आली. मात्र तरीही टेनिसपटूंना या स्पर्धेमधून लाभ मिळणार आहे. ऑल इंग्लंड क्लबने इंश्युरन्स कंपनीसोबत याबाबत चर्चा केली. याच पार्श्वभूमीवर आता 620 टेनिसपटूंना 94 कोटी रूपये देण्यात येणार आहेत. या वर्षी 29 जूनपासून ही स्पर्धा खेळवण्यात येणार होती. आता ही स्पर्धा पुढल्या वर्षी 28 जून ते 11 जुलै या कालावधीत पार पडेल.

या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये सहभागी झालेल्या 256 खेळाडूंना प्रत्येकी 23 लाख रूपये देण्यात येणार आहेत. तसेच पात्रता फेरी खेळणाऱया 224 टेनिसपटूंना प्रत्येकी 11.7 लाख रूपये देण्यात येणार आहेत. दुहेरीत खेळणाऱया 120 खेळाडूंपैकी प्रत्येकाला 5.8 लाख रूपये देण्यात येतील. व्हिलचेअर प्रकारातील खेळाडूंना 5.6 लाख रूपये मिळतील.

… तरीही 1450 कोटींचे नुकसान
विम्बल्डन स्पर्धा रद्द झाल्यामुळे आयोजकांना तब्बल 2400 कोटींचे नुकसान झाले आहे. मात्र 2003 सालामध्ये आलेल्या सार्स महामारीनंतर आयोजकांनी विमा पॉलिसी अपडेट केली. त्यानुसार आता आयोजकांना विमाच्या रूपात 950 कोटी रूपये मिळाले. पण तरीही ऑल इंग्लंड क्लबला 1450 कोटींच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या