
हिंदुस्थानचा युवा टेनिसपटू मानस धामणे याने रविवारी ऑस्ट्रेलियाच्या हेडन जोन्सचा सरळ सेटमध्ये पराभव करीत विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील मुलांच्या एकेरीत विजयी सलामी दिली.
बिगरमानांकित 15 वर्षीय मानस धामणेने 47 व्या मानांकित 16 वर्षीय हेडन जोन्सचा 6-2, 6-4 असा धुव्वा उडविला. ही लढत एक तास 13 मिनिटांपर्यंत चालली. मानसची गाठ आता अव्वल मानांकित बोलीवियाच्या जुआन कार्लोस प्राडो एंजेलो यांच्याशी पडण्याची शक्यता आहे. इटलीतील पियाटी टेनिस सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या मानस धामणेने याआधी विम्बल्डनच्या पात्रता स्पर्धेतील पहिल्या फेरीत सर्बियाच्या वुक राऊजेनोविच याचा 6-3, 6-2 असा पराभव केला होता. त्यानंतर त्याने दहाव्या मानांकित तुर्कीच्या अताकन कराहनवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत विजय मिळविला होता.
बोपन्ना सलामीलाच गारद
हिंदुस्थानचा रोहन बोपन्ना व त्याची कॅनडाची साथीदार गॅब्रिएला डब्रोवस्की या सहाव्या मानांकित जोडीला विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीत सलामीलाच पराभव पत्करावा लागला. त्यांना क्रोएशियाचा इवॅन डॉडिग व चीनी तैपेईची लतिशा चान या जोडीने 6-7 (5/7), 6-3, 6-4 असे हरविले.



























































