पतीचा काटा काढणाऱ्या पत्नीसह प्रियकराला जन्मठेप

विवाहबाह्य संबंधात काटा बनलेल्या पतीची हत्या करणाऱ्या पत्नी व तिच्या प्रियकराला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रीतीदेवीसिंग राठोड व गौरवसिंग असे या दोघांचे नाव आहे. पोलिसांनी सादर केलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.सी. शिंदे यांनी त्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. प्रीतीदेवी हिचा कानपूर येथे राहणाऱ्या हरिओमसोबत विवाह झाला होता. मात्र तिचे त्याच परिसरातील गौरवसिंग याच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे हरिओमचा काटा काढण्याचा त्यांनी कट रचला. त्या दोघांनी हरिओमला नोकरी लावण्याच्या बहाण्याने पनवेलच्या पळस्पे येथे आणले. दरम्यान चाकूने भोसकून गळा चिरत त्याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सर्व पुरावे न्यायालयात सादर करताच न्यायालयाने सबळ पुराव्यांच्या मदतीने दोघांना शिक्षा ठोठावली.