लग्नास नकार दिला; तरुणीने प्रियकरावर केला अॅसिडहल्ला

लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीवर अॅसिडहल्ला करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, लग्नाला नकार दिल्याने तरुणीने प्रियकरावर अॅसिड हल्ला केल्याची घटना त्रिपुरामध्ये घडली आहे. पोलिसांनी तरुणीला अटक केली असून तिला खोवई येथील न्यायालयात हजर केले असता तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तरुणाच्या कुटुंबियांनी तरुणीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

त्रिपुरातील खोवई जिल्ह्यात बिनता संथाल या 27 वर्षांच्या तरुणीने तिच्या 30 वर्षांच्या प्रियकरावर अॅसिड हल्ला केला. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने तिने अॅसिड हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. या अॅसिड हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून जी.बी. पंत रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला श्वसनाचा त्रास होत असून चेहरा, नाक आणि डोळ्यांना इजा झाली आहे.

या हल्ल्यानंतर तरुणाच्या कटुंबियांनी तक्रार दाखल केल्यावर आगररळा येथून बिनता संथालला अटक करण्यात आली. बिनता आणि तिचा प्रियकर यांचे आठ वर्षांपासून प्रेसमसंबंध होते. मात्र, तिच्या प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास आणि तिच्याशी बोलण्यास नकार दिल्याने बिनताने 19 ऑक्टोबरला त्याच्यावर अॅसिड हल्ला केला.

आपल्या प्रियकराचे दुसऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. तसेच त्याने लग्न करण्यास आणि आपल्याशी बोलण्यास नकार दिल्याचा राग मनात होता. त्यामुळे त्याच्यावर अॅसिड हल्ला केल्याचे बिनताने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिला न्यायालयात हजार केले असता तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या