कधीही दारू न प्यायलेल्या महिलेच्या शरीरातच तयार होते दारू, डॉक्टरही शॉक

आयुष्यात कधीही दारू न प्यायलेल्या एका महिलेला तिचे रिपोर्ट्स पाहून दारूचे व्यसन आहे का? असे डॉक्टरांनी विचारले तेव्हा तिला धक्काच बसला. तिच्या लघवीमध्ये मोठ्या प्रमाणात दारू आढळल्याने डॉक्टर देखील आश्चर्यचकीत झाले. केनेची असे त्या महिलेचे नाव असून ती अमेरिकेतील पिटर्सबर्ग शहरात राहते. केनेचीला ‘युरिनरी ऑटो ब्रुअरी सिंड्रोम’ हा आजार असून या आजारामुळे तिच्या मूत्राशयात मूत्राची चक्क दारू तयार होते.

केनेचीचे यकृत खराब झाल्यामुळे तिच्यावर यकृत प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. डॉक्टरांनी तिला दारूचे व्यसन आहे का असे विचारले असता आपण एक थेंबही दारू प्यायलेलो नाही असे केनेचीने त्यांना सांगितले. मात्र तिच्या या बोलण्यावर डॉक्टरांना विश्वास बसला नाही कारण केनेची लघवीच्या रिपोर्ट्समध्ये मोठ्या प्रमाणात दारूचे प्रमाण आढळून आले. तरीही केनेची सतत दारू पिण्याच्या प्रश्नाला नकारच देत होती. डॉक्टरांना ती खोटं बोलतेय असे वाटले. त्यामुळे त्यांनी तिला व्यसन मुक्ती केंद्रात पाठवले मात्र तिथेही तिने तिला दारूचे व्यसन नसल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या आणखी काही चाचण्या केल्या असता त्यांना धक्काच बसला. केनेचीच्या शरीरातच दारू तयार होत असल्याचे त्या अहवालातून समोर आले होते. साधारणत: बिअर ज्या प्रकारे तयार केली जाते तशीच प्रक्रिया केनेचीच्या मूत्राशयात घडते असे तिच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

केनेचीच्या मूत्राशयात ‘कॅन्डिडा ग्लाब्राता’ हे यीस्ट तयार होत असून त्या यीस्टमुळे तिच्या मूत्राचे दारूत रुपांतर होत आहे. तिच्या शरीरातच तयार होणाऱ्या दारूमुळे तिचे यकृत देखील खराब झाले असून आता तिला यकृत प्रत्यारोपण करावे लागत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या