टाटांचा ‘डीपफेक’ व्हिडीओ महिलेची चार लाखांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा बनावट (डीपफेक) व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करून गुंतवणुकीचे आमिष दाखवत कात्रज येथील एका ३८ वर्षीय महिलेची ४ लाख ९ हजार १०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फिर्यादी यांना रतन टाटा यांचा कथित व्हिडिओ दिसला. त्या व्हिडीओमध्ये मोठा आर्थिक परतावा मिळवून देणाऱ्या गुंतवणूक योजनेची माहिती होती. व्हिडीओसोबतच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर महिलेला अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. तेथून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवत महिलेची ४ लाख ९ हजार १०० रुपयांची फसवणूक करण्यात आली.