
बंगळुरूहून जयपूरला जाणाऱया इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात एका प्रवाशी महिलेने प्रवासादरम्यानच बाळाला जन्म दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे विमानातच प्रवास करणाऱया डॉ. शुभाना नजीर यांनी या महिलेची सुखरूप प्रसूती केली आहे.
बुधवारी सकाळी बंगळुरूवरून जयपूरला जाणाऱया 6 ई 469 या विमानातून ही महिला प्रवास करत होती. प्रवासादरम्यान या महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या, त्यानंतर विमानातील कर्मचाऱयांची धावपळ सुरू झाली. याच विमानातूनच प्रवास करणाऱया डॉ. शुभाना नजीर यांनी पुढाकार घेत महिलेची सुखरूप प्रसूती केली. या महिलेने गोंडस चिमुकलीला जन्म दिला आहे.
जयपूर विमानतळावर तात्काळ याबाबत सूचना देऊन तिथे डॉक्टर आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. जयपूर विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सने ‘थँक यू’ कार्ड देत डॉक्टरांचे आभार मानले आहेत. विमानातील कर्मचाऱयांनी बाळासोबतचा फोटो शेअर केलाय. सोशल मीडियावरही हे फोटो व्हायरल होत आहेत.


























































