प्रेयसीने प्रियकराला सुटकेसमध्ये केले बंद, गुदमरून मृत्यू

1677
प्रातिनिधिक

प्रियकराने धोका दिला म्हणून त्याच्या प्रेयसीने त्याला सुटकेसमध्ये बंद करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना फ्लोरिडा येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसीला अटक केली आहे. दरम्यान ही महिला मानसिक रुग्ण आहे का याचा देखील पोलीस तपास करत आहेत.

फ्लोरिडातील ऑरेंज काऊंटी येथे साहा बुने (42) ही महिला तिचा बॉयफ्रेंड जॉर्ज टोरेस ज्युनियर सोबत राहायची. बुने हिने सोमवारी दुपारी पोलिसांना फोन करून बोलावले व तिच्या बॉयफ्रेंडचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तिची चौकशी केली असता तिने पोलिसांना सांगितले की ते दोघे रविवारी रात्री भरपूर दारू प्यायले होते. त्यानंतर त्यांनी एक साहसी खेळ खेळण्याचे ठरवले. त्यानुसार जॉर्जने सुटकेसमध्ये स्वत:ला बंद करून त्यात काही काळ राहण्याचे ठरवले. त्यानंतर बुनेने जॉर्जला सुटकेसमध्ये बंद केले व ती माळ्यावर निघून गेली. जास्त दारू प्यायल्याने तिच्या डोळ्यांवर गुंगी होती व ती तिथेच झोपून गेली. सकाळी जेव्हा तिला जाग आली. त्यावेळी तिला घरात जॉर्ज कुठेही दिसला नाही. तिने सगळीकडे शोधाशोध केली. त्यानंतर तिच्या लक्षात आले की जॉर्ज सुटकेसमध्येच अडकला आहे. तिने सुटकेस खोलली मात्र तोपर्यंत जॉर्जचा गुदमरून मृत्यू झाला होता.

मात्र पोलिसांना बुनेच्या बोलण्यातून ती काहीतरी लपवतेय असा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तर त्यातील खालच्या खोलीतील तीन कॅमेरे बंद होते व फक्त वरच्या माळ्यावरचा सीसीटीव्ही कॅमेरा सुरू होता. त्यामुळे पोलिसांनी तो तपासला असता त्यात बुने पहाटे नंतर वरच्या माळ्यावर आल्याचे दिसले. तसेच त्यात रात्री बराच वेळ जॉर्ज मदतीसाठी ओरडत असल्याचा व तेव्हा बुने मोठ मोठ्याने हसल्याचा आवाज देखील रेकॉर्ड झाला. तसेच त्यावेळी ‘एखाद्याला फसवल्यानंतर त्याला देखील असंच घुसमटल्यासारखं वाटतं’ असे बुनेच्या तोंडचे वाक्य रेकॉर्ड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी बुनेची अधिक चौकशी केली असता तिने तिचा गुन्हा कबूल केला.

आपली प्रतिक्रिया द्या