जुना सोफा विकायच्या नादात खात्यातून गेले दीड लाख, वाचा बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरचा जुना सोफा विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेला दीड लाख रुपये गमवावे लागले आहेत. उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील सायबर गुन्हेगारांनी त्यांचा सोफा खरेदी करण्याच्या निमित्ताने हा गंडा घातला आहे.

नोएडा येथील सेक्टर 119 मध्ये राहणाऱ्या प्रियंका हिने काही दिवसांपूर्वी तिच्या घरातील सोफा विकण्यासाठी एका अॅप्लिकेशनवर जाहीरात दिली होती. त्यानंतर तिच्याकडे अंकित नावाच्या एका तरुणाचा फोन आला. त्याने सोफा खरेदी करण्याबाबत विचारणा केली. हा व्यवहार 37 हजार 500 रुपयांवर ठरला.

अंकितने ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवण्यासाठी प्रियंकाचा नंबर मागितला. त्यानंतर त्याने तिला गोड बोलून त्याच्या क्रमांकावर एक रुपया पाठवायला सांगितला. त्यानंतर तिचा विश्वास जिंकण्यासाठी त्याने तो परतही केला. या व्यवहारानंतर अंकितने तिला एक स्कॅन कोड पाठवला. पीडितेने तो स्कॅन केल्यानंतर तिच्या खात्यातून 97 हजार 500 रुपये कापले गेले.

जास्त रक्कम कापल्याबाबत दिलगिरी व्यक्त करून सदर आरोपीने पुन्हा तिला गोड बोलून दुसरा स्कॅन कोड पाठवला. त्यावरून स्कॅन केल्यानंतर तिच्या खात्यातून 60 हजार रुपये उडाले. यानंतर अंकितचा फोन बंद झाला. पीडितेने या बाबत नोएडा सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे.