
मुलाकडे वडिलांची तक्रार केल्याच्या रागास्तव महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार कोपरगाव येथे घडला आहे. माझ्या घरासमोर तुझे वडील चकरा मारतात अशी तक्रार महिलेने मुलाकडे केली होती. त्यामुळे रागावून बापाने मुलादेखत महिलेचा विनयभंग केला. या वेळी महिलेने मुलाकडे विनवणी केली असता त्यानेही शिवीगाळ केली. ही घटना कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथे घडली असून बापलेकाविरुद्ध कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी ही मंगळवारी 31 रोजी रात्री 9:30 वाजता आपल्या घरातील पलंगावर बसून टीव्ही पाहत असताना आरोपी विठ्ठल गणपत निकम व मुलगा गणेश विठ्ठल निकम हे दोघे घरात घुसले. विठ्ठल निकम यांनी तू माझ्या मुलाला काय सांगितलेस, असा जाब विचारत मुलादेखत तिचा विनयभंग केला. यावेळी महिलेने समोर उभ्या असलेल्या गणेश निकम याला तुझ्या बापाला समजावून सांग, अशी विनवणी केली. मात्र, याचा राग आल्याने गणेशही महिलेला शिवीगाळ केली. स्वतःची सुटका करण्यासाठी महिलेने विठ्ठल निकम यांच्या हाताला धक्का मारला आणि तिने घराबाहेर पडून आरडाओरडा करायला सुरुवात केली.
तिचा आरडाओरडा ऐकून गावाच्या वेशीजवळ बसलेले संतोष छबू निकम, नारायण भागवत निकम, पुंडलिक भाऊसाहेब निकम, हौशीराम छबू निकम हे चौघे जण पळत आले आणि त्यांनी महिलेची सुटका केली. तसेच या दोन्ही बापलेकांना त्यांच्या घरी जाण्यास पाठवले. पण, जातानाही विठ्ठल याने महिलेला जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. या प्रकरणाची तक्रार पीडित महिलेने कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विठ्ठल गणपत निकम व गणेश विठ्ठल निकम या दोघांविरुद्ध भादवि कलम 452, 354, 34, 109, 506, 504 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस. सी. पवार हे तपास करीत आहे.


























































