परीक्षेत पहिलं येणं विद्यार्थ्याच्या जिवावर बेतलं, सेकंड टॉपर मुलाच्या आईने केली हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परीक्षेत पहिला क्रमांक मिळवणं हे एका विद्यार्थ्याच्या जिवावर बेतलं आहे. परीक्षेत दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्याच्या आईने त्याला विष देऊन त्याची हत्या केल्याची घटना पुद्दुचेरी येथे घडली आहे.

या विद्यार्थ्याचं नाव बाला मणिकंदन असं असून तो त्याच्या आई वडिलांसह पुद्दुचेरीच्या कराईकल येथे राहतो. तो कराईकल येथील खासगी शाळेत आठव्या इयत्तेत शिकत होता. त्याने नुकताच एका परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला होता. पण, त्याच परीक्षेत दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्याची आई व्हिक्टोरिया हिला हे पसंत पडलं नाही. त्यामुळे तिने बालाला ठार मारण्याचा कट रचला.

शनिवारी बाला शाळेतून घरी आला. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याला सतत उलट्या होऊ लागल्या. जेव्हा त्याला त्याच्या आईने शाळेत काही खाल्लं होतं का, याबाबत विचारणा केली. तेव्हा तो म्हणाला की त्याने त्याला शाळेच्या सुरक्षारक्षकाने आणून दिलेला ज्यूस प्यायल्याचं सांगितलं. यानंतर बालाला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर बालाच्या आई-वडिलांनी सुरक्षारक्षकाला ज्यूस देण्याचं कारण विचारलं, तेव्हा एका महिलेने तो बालासाठी आणल्याचं त्याने सांगितलं. बालाच्या घरून तो ज्यूस त्याच्यासाठी आल्याचं त्या महिलेने सुरक्षारक्षकाला सांगितलं होतं. सीसीटीव्ही फुटेजवरून या महिलेची ओळख पटली. ती महिला बालाचा वर्गमित्र अरुल मॅरीची आई व्हिक्टोरिया असल्याचं निष्पन्न झालं.

दरम्यान, बालाच्या शवविच्छेदन अहवालात त्याला विष देण्यात आल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी व्हिक्टोरियाला अटक केली. तिची चौकशी केल्यानंतर तिनेच बालाला विष दिल्याचं कबूल केलं. आपला मुलगा सतत दुसऱ्या क्रमांकावर यायचा आणि बाला सतत परीक्षेत पहिल्या क्रमांकावर असायचा. याचाच मत्सर वाटल्याने आपण बालाला विष दिल्याचं व्हिक्टोरियाने कबूल केलं.