
सामना प्रतिनिधी। न्हावाशेवा
प्रेम प्रकरणात फसवणूक झाल्याने एका २६ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उरण तालुक्यातील द्रोणागिरी सेक्टर ५१ मध्ये घडली आहे. रेश्मा सय्यद (२६) असे या तरुणीचे नाव असून अरफान मुल्ला (३०) असे तिच्या प्रियकराचे नाव आहे.
रेश्मा आणि अरफान यांचे प्रेमसंबध होते. अरफानने तिला निकाहचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. यामुळे अरफान आपल्याशी निकाह करणार असा विश्वास रेश्माला होता. मात्र रेश्माचे यापूर्वीही एक निकाह झाल्याचे समजल्यानंतर अरफानने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यामुळे नैराश्य आलेल्या रेश्माने रविवारी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात रेश्माच्या भावाने तक्रार केल्यानंतर आरोपी अरफान मुल्ला व त्याच्या भावाला अटक कऱण्यात आली आहे. त्यांच्यावर दोघांवर भा.द.वि.३०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,अरफानला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


























































