मायक्रो फायनान्स कंपनीने दिलेली कर्जे माफ करा, कोल्हापुरात महिलांचा मोर्चा

खासगी मायक्रो फायनान्स कंपनीने दिलेली कर्जे माफ करा, कर्ज वसुलीस स्थगिती द्यावी, बेकायदेशीर फायनान्स कंपन्या बंद करा आदी मागण्यांसाठी छत्रपती महिला शासन आघाडीच्यावतीने आज शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात धडक मोर्चा काढला.

दरम्यान जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याबाबत त्यांनी राज्य शासनाला त्वरित कळवण्याचे आश्वासन दिले. तर मायक्रोफायनान्स कंपन्यांबाबत लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला.

 

जिल्ह्यातील खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून बेकायदेशीर व्यवहार केले जात आहेत. महिला कर्जदारांच्या घरी रात्री-अपरात्री जाऊन वसुलीसाठी या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून धमकावले जात आहे. महिलांशी उद्धट वर्तन करत त्यांना अश्लील भाषेत दमदाटी केली जात आहे. या कंपन्यांना त्रासलेल्या महिलांनी विविध आंदोलनातुन याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे. आज कावळा नाका परिसरात छत्रपती ताराराणी चौकातून भर पावसांत शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पोलिसांनी अडविल्याने,  कार्यालयासमोरच तब्बल दीड ते दोन तास ठिय्या आंदोलन करत खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

छत्रपती शासन महिला आघाडीच्या अध्यक्षा दिव्या मगदूम यांच्यासह शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बोलावून घेऊन निवेदन स्वीकारले.

आपली प्रतिक्रिया द्या