मशिनमध्ये अडकून महिला कामगाराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाई येथील औद्योगिक वसाहतीतील गरवारे कंपनीत काम करणाऱ्या महिला कामगाराचा मशिनमध्ये अडकल्याने मृत्यू झाला. छाया संतोष बोधे (वय 35, रा. रविवार पेठ, वाई) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

छाया बोधे या गरवारे टेक्निकल फायबर्स या कंपनीत मागील दहा वर्षांपासून काम करीत आहेत. सकाळी त्या कामावर गेल्या. काम करण्यासाठी मशिन सुरू करीत असताना त्यांचा पाय नेटमध्ये अडकल्याने त्यांचे संपूर्ण शरीर वेगाने दोरीसोबत गुंडाळले गेले. यावेळी कामावर असलेल्या अन्य कामगारांनी त्वरित मशिन बंद केले. तोपर्यंत बोधे यांची शुद्ध हरपली होती.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी छाया बोधे यांना तातडीने वाईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, त्यापूर्वीच छाया बोधे यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती संतोष तान्याबा बोधे हेदेखील कंपनीत काम करीत आहेत. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.