ब्रिजभूषण यांच्या सहकाऱ्यांनी दबाव आणला, महिला पैलवानांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Brij Bhushan Singh

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या सहकाऱ्यांवर महिला पैलवानांनी जबाब बदलण्यासाठी दबाव आणल्याचे आरोप केले आहेत. सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीसमोर जबाब देताना त्यांचे काही सहकारी तिथेच वावरत होते आणि त्यांनी हा दबाव आणल्याचं पैलवानांचं म्हणणं आहे.

महिला पैलवानांनी या प्रकरणी लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीसमोर जबाब देण्यासाठी जाण्यापूर्वी या धमक्या देण्यात आल्या आहेत. याबाबत 13 फेब्रुवारी 2023 रोजी ईमेलने तक्रारही करण्यात आली होती. 9 फेब्रुवारी रोजी जेएलएन स्टेडियममध्ये आपला जबाब नोंदवत असताना ब्रिजभूषण यांचे काही सहकारी तिथे होते. वास्तविक आमच्या जबाबनोंदणी प्रक्रियेवेळी संपूर्ण गोपनीयता असणं अपेक्षित होतं. पण, तरीही जयप्रकाश, महावीर बिश्नोई आणि दिलीप हे सिंह यांचे सहकारी संपूर्ण दिवस त्या खोलीबाहेर टेहळणी केल्यासारखे फिरत होते. त्यामुळे तिथल्या वातावरणात ताण निर्माण झाला होता.

त्यांनी पीडित पैलवानांना धमकावून दबाव आणण्याचाही प्रयत्न केला, जे संपूर्णतः चुकीचं होतं, असं पैलवानांचं म्हणणं आहे. कायद्यानुसार, त्यांनी तिथे उपस्थित असणं चूक होतं. त्यामुळे आमच्या जबाबनोंदणीवेळी असलेल्या खासगीपणा आणि गुप्ततेच्या अटीचा भंग होत असल्याचं पैलवानांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.