
सामना ऑनलाईन, मुंबई
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तब्बल 24 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बर्मिंगहॅक येथे 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला टी-20 क्रिकेटचा समावेश होण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जोरदार फिल्डिंग लावली आहे. या आधी 1998च्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेट खेळवण्यात आले होते. त्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली होती.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या टी-20 क्रिकेटचा समावेश होण्यासाठी ‘आयसीसी’ने रीतसर अर्ज पाठवला आहे. ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी त्यासंबंधीची माहिती दिली आहे. ‘आयसीसी’ने हा अर्ज इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली केला आहे. ‘आयसीसी’चा अर्ज मान्य केल्यास 24 वर्षांनंतर पुन्हा क्रिकेट राष्ट्रकुल स्पर्धेत दिसेल. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीने हे पाऊल उचलले आहे. ‘क्रिकेटला जगभरात मोठा प्रेक्षककर्ग आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत त्याचा समावेश झाल्याने दोन्ही घटकांना समान फायदा होईल. या पुढाकाराने महिला क्रिकेटलाही प्रोत्साहन मिळेल. महिला क्रिकेटला चालना देण्यासाठी बर्मिंगहॅम हे योग्य ठिकाण आहे. या शहरातील 23 टक्के नागरिक क्रिकेटशी निगडित आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाल्यास येथे क्रिकेट संस्कृती आणखी वाढेल’ अशी आशाही रिचर्डसन यांनी क्यक्त केली.




























































