हिंदुस्थानकडून जर्मनीचा धुव्वा, महिला विश्वचषक कबड्डी

गतविजेत्या हिंदुस्थानने दुसऱया महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धेत पहिल्या दोन्ही लढतींप्रमाणे तिसऱया लढतीतही प्रतिस्पर्धी जर्मनीचा 63-22 असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीतील आपला प्रवेश जवळजवळ निश्चित केला. आता शेवटची साखळी लढत युगांडाशी होणार असून यातही मोठा विजय अपेक्षित आहे. हिंदुस्थानप्रमाणे ‘ब’ गटातून इराणनेही विजयाची हॅटट्रिक साजरी करत आपलाही उपांत्य फेरीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.

वर्ल्ड कप कबड्डीत प्रथमच खेळत असलेल्या जर्मनी संघाचा खेळ पाहून त्यांच्या खेळाडू बालवाडीत असल्यासारख्या खेळत असल्यामुळे त्यांचा दारुण पराभव आधीच दिसत होता. जर्मनीचा खेळ पाहून हिंदुस्थानचा संघ अर्ध्या ताकदीनिशी खेळला तरीही त्यांनी सहजपणे गुणांची पन्नाशी गाठली. जर्मनीचा संघ इतका कमकुवत होता की, हिंदुस्थानने त्यांच्यावर पाच लोण चढवले. आज झालेल्या अन्य सामन्यांत इराणने तैपेईचा 31-21, नेपाळने केनियाचा 28-21 तर युगांडाने जर्मनीचा 65-17 असा धुव्वा उडवला. हिंदुस्थानने जर्मनीविरुद्ध शांत खेळ केला होता. मात्र दुबळय़ा युगांडाने आपल्यापेक्षा कमकुवत असलेल्या जर्मनीविरुद्ध 65 गुण मिळवत सर्वांना आपला वेगवान खेळ दाखवला.