
महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणप्रकरणी राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (डब्लूएफआय) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध रविवारपासून कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले आहे. या गंभीर प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. मात्र लोकांना ‘मन की बात’ सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत या महिला कुस्तीपटूंची आर्त हाक अद्याप पोहोचलेली नाही. ‘हमारी मन की बात सुनो’ असे म्हणत या कुस्तीपटूंनी आता पंतप्रधानांकडे भेटीची वेळ मागितली आहे.
विविध शेतकरी संघटना, खाप नेते, विविध पक्ष व महिला संघटना यांनी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दिला आहे, मात्र महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणासारखा गंभीर मुद्दा असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर अद्याप एक शब्दही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंमध्ये कमालीची नाराजी आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमची ‘मन की बात’ कधी समजणार? त्यांच्या पक्षाचे खासदार व ‘डब्लूएफआय’चे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केले आहे. याबद्दल बोलण्यासाठी आम्हाला तुमची वेळ हवी आहे, अशी मागणी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी केली.
खेळाडूंना न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागणे दुर्दैवी – सत्यपाल मलिक
आंदोलनाच्या ठिकाणीच केला सराव
आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी बुधवारी सकाळी रस्त्यावरच आपला सराव केला. बजरंग पुनियासह विनेश पह्गाट, साक्षी मलिक अशा ऑलिम्पियन कुस्तीपटूंनीही रस्त्यावरच व्यायाम केला. ‘आम्ही शांततेच्या मार्गाने आमचे आंदोलन पुढे नेत आहोत. याचबरोबर येथेच सरावही करीत आहोत. देशासाठी पदक जिंकून देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे याची आम्हाला जाण आहे. पोलिसांनी अजूनही बृजभूषण शरण सिंह यांच्यावर एफआयआर दाखल केलेली नाही. पोलीस आम्हाला आंदोलन करण्यापासून व सराव करण्यापासून रोखू शकत नाही,’ असे बजरंग पुनियाने सांगितले.



























































