
आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात देशाचा तिरंगा अभिमानाने फडकविणाऱया खेळाडूंना स्वतःवर झालेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असेल तर याहून दुर्दैव ते काय? अशी टीका जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली.
जम्मू-कश्मीरचे अखेरचे राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक यांनी मंगळवारी ऑलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनियाशी मोबाईलवर चर्चा केली होती. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी यांनी आंदोलनकर्त्या खेळाडूंना जंतरमंतरवर येऊन भेट दिली. ते म्हणाले, ‘आपल्या मुली जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके जिंकतात तेव्हा याच मुलींचा आपण गौरव करतो, त्यांच्यासोबत सेल्फी काढत असतो, मात्र आज त्या स्वतःवर झालेल्या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरल्या आहेत तर त्यांना आपण समर्थन द्यायलाच हवे. लैंगिक शोषण झालेल्या महिला कुस्तीपटूंकडे पुरावे मागण्यात आले ही अत्यंत लाजिरवाणी बाब होय. आपण सर्व देशवासीय ठामपणे या मुलींच्या पाठीशी उभे राहून सत्तेची मस्ती चढलेल्या लोकांना त्यांची जागा दाखवून देऊ,’ असा निर्धार सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केला.
























































