
राज्यावर दुष्काळाचे संकट कोसळल्याने बँका, फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी जाऊ नये असे आदेश सरकारने दिले असताना अवघ्या दहा हजारांच्या कर्जासाठी नांदेडमध्ये एका शेतकऱ्याचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. फायनान्स कंपनीतच या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला. फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱयांनीच आपल्या माणसाचा घातपात करून त्यांच्या गळ्याला फास लावल्याचा गंभीर आरोप मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. चंद्रकांत शिंदे (40) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
नांदेडमधील माळकौठा येथील रहिवासी आणि दोन एकर शेती असलेल्या चंद्रकांत शिंदे यांनी आपल्या आर्थिक गरजेसाठी ‘केएफ एंटरप्रायजेस’ या खासगी फायनान्स कंपनीकडून दहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडले नसल्याचे सांगत संबंधित कंपनीने शिंदे यांना बुधवारी कर्जवसुलीसाठी थेट फायनान्स कंपनीच्या कार्यालयात नेले होते, मात्र त्या दिवशी ते घरी परतलेच नाहीत. त्यानंतर गुरुवारी फायनान्स कंपनीच्या कार्यालयातच त्यांचा मृतदेह आढळला. शिंदे यांना कार्यालयातच डांबून छळवणूक करून त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दाखवण्याचा प्रयत्न यामध्ये झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
संशयास्पद मृत्यूची नोंद
नातलगांनी शिंदे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. मात्र पोलीस प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे नातलगांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर संशयास्पद मृत्यू झाल्याची नोंद करून तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळेल, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कुटुंब वाऱ्यावर
मृत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मात्र शिंदे यांच्या मृत्यूमुळे घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंब वाऱ्यावर पडले आहे. या घटनेमुळे फायनान्स कंपन्यांची दडपशाही आणि छळवणूक कधी थांबणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.





















































