मुफ्ती आणि अब्दुल्लांना देशाचे तुकडे करू देणार नाही, नरेंद्र मोदी कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कठुआ

जम्मू कश्मीरमधून 370 कलम रद्द केले तर जम्मू कश्मीर हिंदुस्थानपासून वेगळा होईल अशी धमकी देणाऱ्या मेहबुबा मुफ्ती व फारुख अब्दुल्लांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फटाकरले आहे. ‘मुफ्ती व अब्दुल्ला घराण्यांनी जम्मू कश्मीरच्या तीन पिढ्यांचे आयुष्य बर्बाद केले आहे. मात्र मी त्यांना देशाचे तुकडे करू देणार नाही’, असा हल्लाबोल मोदींनी चढवला आहे. कठुआ येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी मुफ्ती व अब्दुल्ला कुटुंबावर हल्ला चढवला.

‘मी झुकतही नाही आणि विकलाही जात नाही. जम्मू कश्मीरच्या तीन पिढ्यांचे आयुष्य बर्बाद केले आहे. त्यामुळे आता कश्मीरच्या उज्ज्वल भविष्यासाठी या दोन कुटुंबांना इथून बाहेर काढायला हवा. ते मोदींविरोधात लढण्यासाठी त्यांच्या संपूर्ण टीमला आणतील. मोदींची हवी तितकी बदनामी करतील. पण ते देशाचे तुकडे करू शकणार नाहीत. मी त्यांना तसे करू देणार नाही, असे यावेळी मोदींनी सांगितले.

पंतप्रधानांनी यावेळी कश्मीरी पंडीतांना त्यांच्या हक्काच्या घरी परत आणणार असल्याचे देखील आश्वासन दिले. ‘काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे कश्मीरी पंडितांना त्यांचे घर सोडून जावे लागले. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना त्यांच्या मतांची एवढी काळजी होती की त्यांनी कश्मीरी पंडीतांवर होणाऱ्या अत्याचारांकडे दुर्लक्ष केले. आम्ही कश्मीरी पंडितांना त्यांच्या हक्काच्या घरी परत आणू, असे आश्वासन यावेळी मोदींनी दिले.