गायीच्या शेणापासून लाकूड तयार करण्याचा उपक्रम; सूर्या गोशाळेचा अनोखा प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

अंत्यविधी, अग्निहोत्र, होमहवनासह विविध धार्मिक कार्यक्रम तसेच कंपनीसाठी उपयोगी ठरणारे व प्रदूषण टाळण्यासाठी नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील सूर्या गोशाळेने गावरान गायीच्या शेणापासून लाकूड तयार केले आहे. हा राज्यातील पहिला उपक्रम असून त्याचा उपयोग प्रदूषण रोखण्यासाठी होणार आहे. शेणापासून तयार झालेले लाकूड अंत्यविधीसाठी वापरावे, असे आवाहन सूर्या गोशाळेचे संस्थापक रमेश भांबरे यांनी केले आहे.

सध्याच्या लाकडाच्या भावातच शेणापासून तयार केलेले लाकूड सूर्या गोशाळेत उपलब्ध आहे. गावरान गायीच्या शेणापासून बनविलेल्या लाकडावर तूप टाकून पेटवल्यास प्रदूषण टाळता येते. अंत्यविधीसाठी आलेल्यांना व ज्याठिकाणी लाकूड जळते, त्या परिसरातील नागरिकांना ते घातक असते. त्यावर उपाय म्हणून शेणापासून तयार केलेले लाकूड सूर्या गोशाळेत तयार होत आहे. गोशाळेत मच्छर अगरबत्तीऐवजी गायीचे शेण, गोमूत्र, भीमसेन कापूर, तांदूळ पावडर, तुळस, गायीचे तूप, अडुळसा पावडर यापासून धूप बनविला जातो. त्यातून ऑाक्सिजन बाहेर पडतो. त्यामुळे प्रदूषण कमी होत आहे.

गावरान गाईच्या शेणापासून तयार होणाऱ्या धुपास गौरी होमहवन, अग्निहोत्र व अंत्यविधीसाठी मोठी मागणी आहे. तसेच गोमूत्रापासून वेगवेगळ्या आजारांवर औषधे बनविण्याचे काम सुरू आहे. याशिवाय विशाल पर्यटन केंद्रात जात्यावर दळलेले पीठ व लाकडी घाण्यावरील तेल, चुलीवर गाडग्यात बनविलेले पदार्थ हे उपक्रम राज्यात यशस्वी झाल्याने ‘न्यूज १८ चॅनेल’ने संस्थेचे संस्थापक रमेश भांबरे यांना पुरस्काराने गौरविले आहे. तर जिल्हा कृषी विभागाच्या वतीने जिल्हा कृषी भूषण पुरस्कार भांबरे यांना विधान परिषदेचे उपसभापती विजय औटी, पालकमंत्री राम शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक लोणारे यांच्या हस्ते देण्यात आला.

सूर्या गोशाळेत सध्या 100 हून गावरान गायी आहेत. या गाईच्या लाकडापासून प्रदूषणमुक्त शहर होण्यासाठी मदत होणार असल्याचे भांबरे यांनी सांगितले. लाकूड मिळण्यासाठी 98 90712520 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. अंत्यविधीसाठी गायीच्या शेणापासून तयार झालेले लाकूड वापरावे. त्यासाठी शहरात असलेल्या अंत्यविधी समितीने लोकांना प्रवृत्त करावे, असे आवाहन भांबरे यांनी केले.