
संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह आगीत भस्मसात होऊन दीड वर्ष होऊनही त्यावेळी जबाबदार लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने आश्वासन देऊनही नाटय़गृहाची पूर्णपणे पुनभारणी झालेली नाही. सध्या काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असले, तरी येत्या जागतिक रंगभूमीदिनीसुद्धा (दि. 27) हे नाटय़गृह पुन्हा ‘शो मस्ट गो ऑन’ करेल, याची शक्यता धूसर झाली आहे. या कामाला आणखी किमान चार ते पाच महिने कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी निर्माण केलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंपैकी एक आणि कोल्हापूरचे सांस्कृतिक वैभव असलेल्या या संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहाला, केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला 8 ऑगस्ट 2024 रोजी आग लागली. यामध्ये या नाटय़गृहाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाहणी करून वर्षभरातच हे नाटय़गृह पूर्ववत सुरू करण्यासह लागेल तेवढा निधी देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार नाटय़गृहाचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प महापालिकेने हाती घेतला. कामातील अनियमिततेमुळे अनेकवेळा येथील रंगकर्मींकडून आंदोलनासह निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. मात्र, आजही हे काम रेंगाळत सुरू आहे.
या कामाच्या पहिल्या टप्प्यामध्ये संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह व राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदान नूतनीकरण, जतन, संवर्धन व पुनर्बांधणीचे काम होते. हे काम लक्ष्मी हेरिकॉन प्रा. लि. मुंबई यांच्या नावे मंजूर असून, यामध्ये ग्राऊटिंग, भिंतींचा गिलावा, छताच्या ट्रस व गर्डरनिर्मिती, कमकुवत भिंतींचे पुनर्बांधकाम आदी कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱया टप्प्यात ग्रीन रूम व अनुषंगिक स्थापत्य कामे असून, ठेकेदार व्ही. के. पाटील कॉन्ट्रक्टर्स अँड इंजिनीअर्स यांच्या वतीने दरवाजे, खिडक्या बसविणे, व्हीआयपी रुम व ग्रीन रुम बांधकाम पूर्ण झाले असून, बाल्कनी व कलादालन जिन्यांची कामे सुरू आहेत. ही कामे प्रगतिपथावर असून, 80 टक्के पूर्ण झाली आहेत.
तिसऱया टप्प्यामधील इंटेरिअर, ऍकॉस्टिक, विद्युतीकरण व वातानुकूलन यंत्रणांची कामे मंजूर असून, ठेकेदार गोदरेज अँड बॉयस एमएफजी. कं. प्रा. लि. यांच्यामार्फत स्टेज, बाल्कनी, ए. सी. यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा, पॅनलिंग, स्वच्छतागृहे आदी कामे एकाचवेळी सुरू आहेत. ती 65 टक्के पूर्ण झाली आहेत. चौथ्या टप्प्यात स्टेज विद्युतीकरण, ड्रेपरी, ऑडिओ-व्हिडीओ प्रणाली, खुर्च्या व बैठक व्यवस्थेचे काम मंजूर आहे. यामध्ये स्टेज लायटिंग, ऑडिओ सिस्टीम, कार्पेट व बैठक व्यवस्थेचे नमुने रंगकर्मींसमोर सादर करून अंतिम करण्यात आले असून, काम सुरू आहे.
याशिवाय खासबाग कुस्ती मैदानाच्या दगडी तटबंदीची दुरुस्ती, प्रवेशद्वाराचे जतन व मजबुतीकरण, नाटय़गृहातील आधुनिक ध्वनी प्रक्षेपण व्यवस्था, स्टेज लायटिंग, नवीन पार्ंकग इमारत, अंतर्गत रस्ते व परिसरातील पायाभूत सुविधा उभारणीसाठी 35 कोटी निधीची मागणी 25 फेब्रुवारी रोजी नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे. त्याचाही पाठपुरावा प्रशासनाच्या वतीने सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
उर्वरित निधी, कामे लवकर पूर्ण करण्याचे नियोजन
संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह पुनर्बांधणी व नूतनीकरण कामासंदर्भात महापौर रूपाराणी निकम यांनी आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्यासह नुकतीच प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पहिल्या टप्प्यातील कामे उत्तमरीत्या पूर्ण झाली असून, उर्वरित टप्प्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या नाटय़गृहाची उर्वरित सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने केल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर आदी उपस्थित होते.


































































