देवळालीत ढिगाऱ्याखाली दबून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

नगरपालिका हद्दीत गटाराचे खोदकाम करून पाण्याची पातळी तपासत असताना माती ढासळल्याने ढिगाऱयाखाली दबून कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी राहुरी पोलिसांत ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. धीरज पूनम भुसार (वय 21, रा. खांडवा, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे.

देवळाली प्रवरा बाजारतळ ते वीटभट्टीमार्गे श्रीरामपूर फाटा रस्त्यावर गटाराचे खोदकाम चालू होते. खोदकाम झाल्यानंतर पाणीपातळी तपासत असताना दोन्ही बाजूला टाकलेली माती अचानक ढासळली. त्यात पाणीपातळी तपासणारा धीरज भुसार हा मातीखाली दबला गेला. हा कामगार खोदलेल्या खड्डय़ात गाडला गेल्याने जेसीबी व पोकलॅनच्या साहाय्याने माती बाजूला करून धीरजला राहुरी फॅक्टरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता.